Sunday, November 14, 2010

Sarp Mitra barobar ek divas.....




नमस्कार !! आज काल टीव्ही किंवा वर्तमान पत्रा मध्ये निवडणुकीच्या काळात या नेत्या बरोबर एक दिवस त्या नेत्या बरोबर एक दिवस असे कार्यक्रम भरपूर येत असतात. माझा हा ब्लॉग ही त्याच्या पठडीतला असला तरी थोडा वेगळा आहे .असा ब्लॉग लिहीण्याचे मी आधी ठरवले नव्हते पण ज्याला मी भेटायला गेलो होतो त्याचे काम पाहून मला ब्लॉग लिहुन त्याचे काम काही लोका पर्यंत पोहोचवावे असे वाटले..
२-३ दिवसा पुर्वीच नारायणगावा जवळील पिंपलवांडी नावाच्या गावामधील माझ्या मित्राला भेटण्याचे ठरवले होते. तो एक सर्प मित्र आहे. त्याने मला फोन करून सांगितले होते की त्याच्याकडे बरेच साप आहेत आणि चांगले पूर्ण वाढ झालेले विषारी साप. त्यामुळे लगेच मी जाण्याचे ठरवले. १३-११-२०१० ला जाण्याचे ठरले. न कर्त्याचा वार होता पण तरीही निघालो.
आता हा मित्र कोण?? त्याचे नाव कैलास पोफळे. माझी आणि त्याची ओळख नारायण गाव बस स्टॅंड वर झालेली. त्यानेच सुरूवात केली प्रथम माझ्याशी बोलण्यास. प्रसंग असा की मी गेलो होतो जुन्नरला बिबट गणना मोहिमेमध्ये. काम संपवून परत घरी जात होतो. गाडी ची वाट पाहत बस स्टॅंड वर बसलो होतो. माझ्या कडे ट्रेकिंगची बॅग होती. ती पाहून हे महाशय माझ्याकडे आले आणि विचारपूस करू लागले. मग आमची गट्टी जमली. अशी माझी आणि याची ओळख झाली. हा माणूस एक रानटी सर्प प्रेमी.
रानटी म्हणण्या चे कारण असे की साप कुठेही आणि कसाही असला तरी त्याला हा गडी पकडणार म्हणजे पकडणाच. त्याच्या रानटीपणा चे एक दोन किस्से येणारच आहेत पुढे. सापबद्दल माहिती असणारे लोक भरपूर पण या माणसाला सापांच्या स्वभावा बद्दल जास्त माहिती. त्यामुळे प्रसंग पाहून हा साप पकडणारा इसम. आजूबाजूच्या लोकाना त्याचा हा प्रकार रानटी वाटत असेल म्हणून मी हा शब्द वापरला. योग्य शब्द सापचे स्वभाव ओळखणारा त्याला लागू होऊ शकतो. निघालो सकाळी लवकर निघालो. बरोबर १० ला त्याच्या कडे पोहोचलो. माझ्या साठी हा त्याच्या मित्रा ला घेऊन स्टॅंड वर आला होता. लगेचच साप बघण्यासाठी मी त्याच्या घरी गेलो. घरा समोर एक काचेची पेटी केली होती त्याच्या मध्ये जवळजवळ ९-१० साप होते. ४ नाग, ४-५ घोणस आणि एक मण्यार. मी सापचे फोटो काढण्यासाठी येणार होतो हे त्याला माहीत होते. लगेच त्याने मोठ मोठे २ नाग, ३ घोणस आणि एक मण्यार बरोबर घेतले. हे सगळे एका पोत्या मध्ये घालत असताना बरेच लोक जमले. आणि मग लोकांची प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. काही प्रश्नांची उत्तरे त्याने दिले पण नंतर मात्र एकदम वैतागून एका व्यकतीस म्हणाला जरा शांत रहा मला माझे काम पूर्ण करू द्या मग मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो. त्यासरशी सगळे गप गार. सगळे साप पोत्या मध्ये भरून आम्ही निघालो. एक मण्यार आणि एक घोणस माझ्याकडे आणि बाकीचे त्याच्या जवळ. त्याचे मित्र काकडे सुद्धा बरोबर होते. गावातून सगळा पसारा घेऊन आम्ही एका शेतावर गेलो. एक एक साप बाहेर काढून वेगवेगळ्या अँगल ने फोटो काढून घेतले आणि तेवढ्यात त्याचा फोन खणाणला. रिंग टोन तर कुठली नागाची पुंगीच. फोन दुसरा तिसरा कसला नसून साप निघाल्याची बातमीच होती ती.. मला सुद्धा बरे वाटले चला साप पकडायला मिळणार म्हणून. साप मित्राच्या लॅब मध्ये ठेवून आम्ही पहिल्या कॉल वर निघालो. आम्हाला येताना पाहून लहान मुलानी एकच गलका केला आणि न सांगता साप असलेल्या ठिकाणी पळत सुटले. त्यामुळे साप कुठे आहे हे विचरण्यचि गरज पडली नाही. आम्ही ही त्या दिशेला निघालो. घरच्या मागच्या बाजूला सरपण रचले होते त्याच्या खाली साप आहे असे सगळे जण सांगत होते.

कैलास ने लगेच सरपण हलवण्याची सूचना केली. सरपणाच्या खाली उंदारांची बिळे होती आणि त्याच्या मध्येच साप गेला आहे असे सगळ्यानी सांगितले. दुसरी सूचना बिळे उकरण्याची झाली. लोक तो सांगेल तसे करत होते. पूर्ण बिळे उकरुन झाली पण उंदरांशीवाय काहीही निघाले नाही. हे सगळे चालू असतानाच कैलास च्या फोन ची पुंगी वाजली. या वेळी शिंदे बामणी मळा नावाच्या परिसरातून बोलावणे आले होते. घरा मध्ये साप होता. हा साप तर काही हाती लागला नाही. तिथून आम्ही शिंदे बामणी मळा परिसरं मध्ये पोहोचलो. मस्त बाग होती. घरापासून दूर एक खोली होती त्याच्या मध्ये साप होता. आम्ही जसा खोली मध्ये प्रवेश केला तर आतील पसारा पाहून साप कसा शोधायचा विचार करू लागलो. आता या माणसा वर सूचना पाळण्याचि वेळ आली होती. सूचना होती सगळे समान बाहेर काढणे. त्याने सगळे समान बाहेर काढले आता फक्त धान्याची पोती राहिली होती. ती बाजूला केली आणि त्याच्या खालून ७-८ उंदीर आणि एक ६ फुट लांब धामण निघाली. तिला पकडले. न मागता त्या व्यक्ती ने कैलास च्या हातावर थोडे पैसे ठेवले. पैसे आणि धामण घेऊन आम्ही तिथून निघालो.
पकडलेलि धामण एका ओढ्याच्या कडेला सोडुन घरी जातच होतो की लगेच परत पुंगी वाजली आणि सापाचे बोलवणे आले. रस्त्या मध्येच एका वस्तीवर साप होता... एक माणुस सापावर पेटी ठेऊन त्याच्या वर बसला होता व कैलास ची वाट पहात होता. तिथे सुद्धा एक छोटिसी धामण होती. ती घेतलि आणि घरा कड़े निघालो. मध्येच धामण सोडुन आम्ही घरी पोहोचलो. आज दिवस भरा मध्ये ३ कॉल आले आणि त्याच्या मधले २ यशस्वीपणे पूर्ण ही झाले.



कैलासचा रोजचा दिवस असाच जाई. ४-५ कॉल्स आणि तेवढेच कॅच. हा माणूस काही खूप मोठा श्रीमंत नाही किंवा नोकरीवाला ही नाही. लग्न कार्ये, पूजा अशा ठिकाणी स्वयंपाक बनवून आपला आणि आपल्या आई, बायको आणि २ लहान मुले यांचा संसार चालवायचा. या माणसाने आज पर्यंत जवळ जवळ ३०००-४००० साप पकडले आणि वन खात्याच्या मदतीने राना मध्ये सोडून ही दिले आहेत. १०० च्या वर शाळा मध्ये याने सापावर व्याख्याने ही दिली आहेत. व्याख्यान पूर्ण झाल्या वर तो आपला मोबाइल न. सगळ्या विद्यार्थ्याना देतो आणि कधीही घरा जवळ साप निघाला तर सापा ला मारण्या पुर्वी मला एकदा फोन करा अशी कळकळी ची विनंती ही करतो. गावामध्ये फिरताना मला एक ही माणूस असा भेटला नाही ज्याने कैलास ला ओळख दिली नाही. सगळ्यांशी पूर्णपणे हसून खेळून त्याचे काम चालू असते. त्याचे एक एक वाक्य मी टिपत होतो. एका मारुती नावाच्या माणसाला तो सहज म्हणाला ..."काय मारुती ! कधी जाणार वरती ?" त्या माणसाने ही हसत हसत याला उत्तर दिले तुझ्या नंतर.
पूर्ण ३ कॉल्स मध्ये मी त्याच्या बरोबर होतो. कोणत्याही घरा कडे बोट दाखवून तो म्हणायचा की इथे हा साप पकडला, इथे तो साप पकडला. हा साप पकडताना अशी मज्जा आली. आता त्यानेच एक किस्सा मला सांगितला. तो असा की हा कामानिमित्त कुठे तरी बाहेर गावी गेला होता. तिकडेच त्याला गावावरुन सारखे फोन येऊ लागले सापासाठी. त्याने सांगितले की मी तरी लवकर येऊ शकणार नाही तुम्ही तुमच्या जवळच्या सर्प मित्राला बोलावा. त्यानी ही लगेच ३-४ जणाना बोलावून घेतले. २-३ तास ते तिघे जन सापाशी लढले पण साप काय त्याना जवळ येऊ देत नव्हता .५-६ फुट मोठा नाग होता पूर्ण पणे चपळ आणि तेवढाच सावध. तो बसला होता खिडकी मध्ये . तिथे असलेली पारव्याची पिल्ले खायला गेला असेल बहुतेक. आत मध्ये सापाला जाता येत नव्हते आणि बाहेर माणसे त्यामुळे तो खाली ही उतरत नव्हता आणि या चार -पाच जाणानि त्याला चांगलेच सतावले होते. तो पूर्ण फणा वर करून बसला होता... घर मालकाला जाणवले की हे काम ह्यांच्या कडून होणार नाही. त्यानी पुन्हा कैलासला फोन लावला ... कैलास म्हणाला माझे काम झाले आहे, मी येतोच. १५-२० मी. मध्ये तो तिथे पोहोचला. साप कुठे आहे ते पहिले आणि मालकाला म्हणाला एक बेडशीट द्या मला. त्याने बेडशीट आणले. या पठ्याने ते हाताला पूर्ण पणे बांधले आणि शीडी वर चढला आणि सरळ हात घालून त्या नागाच्या फण्या खाली धरले. नागा ने चावायला सुरूवात केली पण दात काही कैलासच्या त्वचेपर्यंत पोहोचले नाहीत. साप घेऊन महाशय १० व्या मिनिटाला खाली. साप जमिनी वर सोडला आणि त्या पोराना म्हणाला आता पकडा. असा हा रानटी कैलास. लोक त्याच्या कडे अवाक् होऊन पाहु लागले..


त्याचा मोबाइल न. जवळ जवळ १-२ लाख लोकाकडे असेल. आणि हा फक्त साप पकडूनच किंवा त्यांचे प्राण वाचवूनच थांबला नाही तर ज्याना साप चावला आहे त्यांचा ही खूप काळजी घेतो. जिथे जिथे सर्पदंशा वर उपचार होतो तिथे तिथे या माणसाच्या शब्दाला किंमत आहे. प्रथम उपचार करून दवाखाना गाठण्याची जबाबदारी ही याचीच. बर्‍याच वेळा साप चावून घेतलेला हा कैलास, याची पुण्यातील ससून मध्ये ही याची चांगली ओळख.
साप सुद्धा साधे सुधे नाहीत ह:. तो परिसर पूर्ण पाने नाग आणि घोणस साठी प्रसिद्ध. एक तरी कॉल घोणस किंवा नागा चा असतोच. आजूबाजूला सगळी कडे ऊस आणि बागायत जमीन. भरपुर उंदीर आणि भरपुर साप.
कैलास बद्दल अजुन एक गोष्ट इथे सांगावी वाटते ती ही की उदारनिर्वहा साठी अगदी जेमतेम काम असणारा हा माणूस साप पकडाल्याचे पैसे कधीही कोणाला ही मागत नाही.. असला धंदा करणारे बरेच पहिले आहेत मी. त्याच्या आजूबाजूच्या गावा मध्ये पण भरपुर मुले तयार झाली आहेत. पण हा कधीही पैसे मागत नाही .... पण लोक आता त्याला स्वताहून पैसे देऊ लागले आहेत .. त्याच्या जवळ स्व:ताची गाडी नाही पण कधीही साप पकडायला जात असताना त्याचा कोण ना कोण तरी मित्र त्याला साप असलेल्या ठिकाणी सोडायला येतो जरी ते ठिकाण गावा पासून २०-२५ किमी दूर असले तरी. भरपुर मित्र


परिवार आणि भरपुर ओळख असलेला हा कैलास आपल्या नावाला जगात होता ... कैलास म्हणजे जिथे भगवान शंकर यांचा वास होता. त्याच प्रमाणे हा सगळ्या सापाना आपल्या मध्ये सामावून घेत होता.
कधी जायला मिळाले तर अवश्य जाऊन भेटा त्याला.
नारायणगाव च्या पुढे नाशिक रोड वर पिंपळवडी नावाचे गाव आहे. तिथे कोणाला ही विचारा. त्याच्या घरी नेऊन सोडतील तुम्हाला . आणि त्याच्या कामा वर खुश होऊन जर द्यावेसे वाटले तर हातभार म्हणून ४ पैसे हातावर ठेवायला विसरू नका.
भीक किंवा सहानुभूती म्हणून नाही तर चांगल्या कार्यामध्ये आपला सहभाग या साठी.
अशा माणसा बरोबर एक दिवस संपवून मी पुन्हा ऑफीस आणि पैशासाठी पुण्यांच्या दिशेने येण्यास निघालो.

2 comments: